Sunday, March 1, 2020

माझी आजी




             माझी आजी आत्ता येवढ्यात देह ठेऊन गेली . जशी सर्वांची आजी असते तशी ती माझी पण आवडती आजी होती. आम्ही सर्व नातवंडे तिला ताई आजी म्हणत असू आणि बाकी सर्व गावातील मंडळी तिला ताई म्हणत असत .ताई आजी म्हणजे माझ्या आईची चुलती पण तिने माझ्या आईला मायेची सावली दिली . आणि आम्हाला पण तेवढाच लळा लावला .
            मला अजूनही चंगाले आठवते आहे मी लहान असताना माझ्या वडिलांचा मोठा अपघात झाला होता आणि त्यांना पुण्यातील एका हॉस्पिटल मध्ये ठेवले होते . त्याचा पाय तुटला होता आणि त्यांना पुन्हा पायावर चालण्यासाठी एक  महीना तिकडेच राहावे लागणार होते. माझे वडील एक प्राथमिक शाळेतील शिक्षक होते. घरी मी माझी छोटी बहीण आणि आई एवढेच छोटे कुटुंब होतो .वडिलांना पुण्यात भार्ति केले होते. आम्ही राहायला तिथून जवळ जवळ ७५ किमी दूर नारायणगाव येथे राहत होतो आणि आईला पण पुण्यात जाणे भाग होते वडिलांच्या मदतीसाठी. आम्ही भावंड तर खूपच लहान होतो .त्यात आईला पुण्यातील काहीच माहिती नव्हते .अशा परिस्थितीत आजी मदतीला धावून आली.तिचे दूरचे नातेवाईक पुण्यात राहायचे .त्यांचे घर पण काही खूप मोठे नव्हते .एका रूम चे छोटेसे बैठे घर पण आम्ही भावंडे आई आजी त्यांचाकडे राहायला गेलो .त्यांच्या कडे पण बरेच लोक राहायला होते एवढ्याश्या घरात पण त्यांनी देखील खूप आदराने आमचे आतिथ्य केले . आजी ने आमचा सांभाळ केला व आई वडिलांचा डब्बा, औषधपाणी बघू लागली .केवढा आधार वाटला आईला त्यावेळी आज्जीचा. ती अशीच होती सर्वांच्या मदतीला धावून जाणारी . सर्वांवर भरभरून प्रेम करणारी .
            आम्ही नातवंडे त्यात मग आम्ही मामे भाऊ , मावस भाऊ , मामे बहिणी , मावस बहिणी ऊनहाळ्याच्या सुट्टीत आजोळी राहायला जायचो आणि खूप दंगा करायचो.आजी कधी एकटी असेल तरी तिने कधी तक्रार केली नाही .कधी आरडाओरडा केला नाही . आम्हाला छान पैकी भाकरी ताक आणि एखादी भाजी वर चटणी असा प्रेमाने भरलेला दुपारची न्याहारीचा बेत पाटीभरून डोक्यावर घेऊन शेतात यायची आणि आम्ही खेळून दमलेलो नातवंड त्यावर तुटून पडायचो .
                        पुढे आम्ही मोठे झालो आणि आजोळी जाणे कमी झाले .कधी मधी आम्ही तिला भेटायला जायचो तर तिची एकाच तक्रार असायची," का रे मला भेटायला येत नाही?. तुम्हाला साधा फोन पण करता येत नाही का ? " तिला खूप वाटायच की यांनी मला भेटायाला यावे माझी चौकशी करावी . म्हणून कधी कधी आम्ही मुद्दामहून वाकडी वाट करून तिला भेटायला जायचो .निघताना तिच्या जवळ जे काही सापडेल जसे की भाज्या , खरवस ,मिठाई , तिच्या परस बागेतील फळे जे जे तिला सापडेल ते ती आम्हाला पिशवीत भरून देत असे .तिच ते प्रेम बघून आम्ही कृतकृत्य होत असू .
            अस प्रेम तिने फक्त आम्हालाच दिल असे नाही .ती एका छोट्याशा गावी रहात असे त्याचे नाव पिंपळगाव . कमी लोकवस्ती असलेले पण सुंदर गाव त्यातील एकूण एक माणूस ताई ला ओळखत होता .त्याला कारण एकच, प्रत्येकाची विचारपूस ती जातीने करायची ,त्यांच्या सुख दू :खात ती धावून जायची . कोणाच्या घरी काही शुभकार्य असुदेत किंवा दू:खद घटणा घडुदेत ताई आजी तिकडे उपस्थित असायचीच .त्यामुळे तिच्या बद्दल आमच्याच काय पण संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांच्या मनात तिच्या बद्दल प्रेम आणि आपुलकी होती.
            आत्ता एवढ्यात ती आम्हा सर्वांना सोडून निघून गेली . ही वार्ता समजल्या वर प्रचंड जनसागर लोटला तिच्या अंतिम दर्शनाला .
हा एवढा लेखन प्रपंच एवढ्याच साठी केला कारण तिने जसे सर्वांना प्रेम आणि आपुलकी दिली तसेच प्रेम आणि  आपुलकी आम्हाला देखील देता येईल का सर्व जगाला ?आज आपण एवढे व्यस्त झालो आहोत की घरातल्या माणसांची देखील आपल्याला विचारपूस करायला वेळ नसतो किंवा आपण तो काढत नाही .आपण त्यांना गृहीत धरून चाललेलो असतो . ही जुनी जाणती देवा सारखी माणसे एक एक करून जगातून निघून गेल्यावर कोण आपल्यावर एवढे निर्व्याज प्रेम करेल ? कोण आपल्याला शिकवेल की आपुलकी कशी जपावी .नाती गोती कशी जपावीत .
                        आजी तुझी आठवण कायम येत राहील मला आणि आम्हा सर्वांना. जाताना तू मात्र खर्‍या प्रेमाला पोरक करून गेलीस ही खंत मात्र कायम राहील मनात 


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

लॉकडाउन

आजची सकाळ काही वेगळीच आहे , सर्वजण चिंतेत आहेत , जी भिती आजपर्यंत ऐकून होतो ती आता हळूहळू अगदी आपल्या घराशेजरी येऊन थबकली आहे. पंतप...