Wednesday, March 25, 2020

लॉकडाउन



आजची सकाळ काही वेगळीच आहे, सर्वजण चिंतेत आहेत, जी भिती आजपर्यंत ऐकून होतो ती आता हळूहळू अगदी आपल्या घराशेजरी येऊन थबकली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे सतत चर्चा करून यातून बाहेर कसे पडता येईल , या संकटाला जास्त हानी न होता लवकरात लवकर कसे थोपवता येईल यात गुंतले आहेत .नाक्या- नाक्यावर पोलिस थांबून प्रत्येक येणार्‍या जाणार्‍याची चौकशी करत आहेत . त्यांनी काही ठिकाणी धाडी टाकल्या आहेत व जे लोक संक्रमित आहेत त्यांना उचलून घेऊन जात आहेत.इकडे वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड त्राण आला आहे. वैद्यकीय सेवा देणारे, त्यांना मदत करणारे , आंगणवाडी सेविका , होमेगार्ड यांना सतर्क राहायला संगितले आहे.फौजेलाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रोज मरणारांची संख्या झपाट्याने वाढत आहे तसे तसे सर्वांच्या मनावरील ताण वाढत चालला आहे. सर्व नागरिकांना घराबाहेर पडू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत . लोक जितके म्हणून राशन जमा करून ठेवता येईल तेवढे जमा करून ठेवत आहेत काय सांगावे किती दिवस असे जीव मुठीत धरून बसावे लागेल हे सांगता येत नाही. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांनी काय करायचे.त्यांची पोरेबाळे उपाशी मरत आहेत. इकडे धन दंडग्यांना वेगळीच चिंता सतावत आहे शेअर बाजार रोज नीचांकी पातळीवर गडगड्त आहे . तुम्हाला वाटेल की मी हे तुम्हाला कुठल्या तरी युद्धाच्या पूर्वीची किंवा दरम्यानची गोष्ट सांगत आहे तर ते तसे नाही ही जागतिक स्थिति झाली आहे एका विषाणू मुळे. त्याचे नाव आहे Covid19 उर्फ कोरोना.

      देशापुढे अनेक संकटे येत असतात त्यात आर्थिक , सामाजिक ,युद्धजन्य परिस्थिति अशी अनेक असतात पण हे संकट वेगळेच आहे हे जागतिक संकट आहे आणि सारे जगच या संकटाने ग्रासले आहे. कोणालाही कल्पना नाही की अजून किती दिवस लागतील या भयंकर संकटातून बाहेर पडायला. हा रोग अजून किती बळी घेईल माहीत नाही. जातानाही ही पीडा अशी सहजच जाणार नाही त्याच्यामुळे खूप सारी आर्थिक संकटे ओढवतील करत सारे जगच याने थांबवून ठेवले आहे सारे उद्योग धंदे बंद पडले आहेत.  

      जगभरात जे जे म्हणून प्रगत देश आहेत त्यांच्याकडे रोज मरणार्‍यांची संख्या जास्त आहे. त्यांनी ह्या आजाराला  खूप सहजतेने घेतले आणि त्याचा परिणाम महामारीत झाला. त्यामानाने भारतात सरकारने ही गोष्ट खूप गांभीर्याने घेतली अगदी पहिल्यापासून आणि या आजाराला समजात पसरू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरू केले .त्याला जागतिक आरोग्य संघटनेने पण दाखल घेतली व भारताच्या प्रयत्नांना सलाम केला. कारण जेंव्हा जगभरातील पुढारलेल्या देशांमध्ये हजारो लोक मारत होते तेंव्हा भारतात एक ते दोन आकडी लोक मारत आहेत. पण हे सोप्पे  नाही इकडे लोक अशिक्षित आहेत जे शिकलेले आहेत ते नियम पळत नाहीत . बाहेर देशातून आले बहुतांश लोक संक्रमित आहेत त्यांना संगितले आहे की लोकांमध्ये मिसळू नका पण त्यातील काही लोक ऐकत नाहीत .त्यामुळे आत्तापर्यंत आटोक्यात असलेला रोग महामारीचे रूप धारण करू शकतो. तसे होऊ नये म्हणून सरकारने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले , कमधंदे बंद केले तरीही ओक ऐकत नव्हते म्हणून जमाव बंदी केली तरी लोक ऐकत नव्हते मग नाइलाजाने महिनाभर संन्चार बंदी केली , सर्व वाहतुकीचे मार्ग जसे हवाई वाहतूक, जल वाहतूक, रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक बंद केली. सर्व राज्यांनी आपापल्या सीमा बंद केल्या , सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या.

      अशा अडचणीच्या काळात देखील काही लोग आपला स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात असतात . त्यांना देवाने काळीज दिलेलेच नसते जणू . जसे की hand sanitizer ( हात निर्जंतुक करण्याचा मलम ) चा काळाबाजार झाला , खराब गुणवत्ता असलेले मलम बाजारात आले . डोकटोरांना लागणारे मास्क चा साठा केला जाऊ लागला .कालच १.५ कोटी किमतीचा  मास्क साठा पोलिसांनी पकडला.

      चीन नंतर यूरोप मध्ये खूपच भयानक परिस्थिती आहे म्हणतात , त्यातल्या त्यात इटली मध्ये तर लोक या विषाणूमुळे धडाधड मरत आहेत. तिकडे आत्तापर्यंत 7 हजारच्या वर लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांच्यावर उपचार करायला इस्पितळे कमी पडत आहेत. जे लोक मेले आहेत त्यांना उचलायला कोणी पुढे येत नाही .सर्वत्र विषणूचा फैलाव झाला आहे.परिस्थिति खूपच गंभीर झाली आहे .अमेरिकेतही, इंग्लंड, जर्मनी, दक्षिण कोरिया, जपान सर्वत्र अशीच परिस्थिति आहे . पुढे काय होईल माहीत नाही पण सर्वांनाच याचा खूप मोठा फटका बसणार आहे हे नक्की . असे दिवस येतील असा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता . ऑलिंपिक स्पर्धा देखील कदाचित पुढे ढकलावी लागली आता ती स्पर्धा २०२१ मध्ये होईल . इतिहासामध्ये असे आत्तापर्यंत केवळ एकदा की दोनदाच घडले आहे म्हणजे विचार करा परिस्थिति किती गंभीर आहे .

      शेवटी देवाला एकच विनंती करावीशी वाटते की हे देवा या संकटातून सर्वांना लवकर बाहेर काढ .लहान मुले , वृध्द आणि तरुण एका जागेवर फार काळ बसू शकत नाहीत त्यांची यातून लवकर सुटका होउदे आणि ही परिस्थिति निवळल्यावर येणारी आर्थिक संकटे वेगळीच असतील ती झेलण्याची ताकत आम्हा सर्वांना दे ..........शुभम भवतू 

Sunday, March 8, 2020

महिला दिन


          

           आज जागतिक महिला दिन आहे, महिलांसाठी एक खास दिन .आपण हा दिन खरच का साजरा करतो ? आणि तो आपण साजरा करतो का ? पृथ्वीवरील मनुष्य जातीच्या आर्धी लोकसंख्या यांची आहे . खरेतर महिलांसाठी असा वेगळा दिन साजरा करायची गरजच का पडते ?
          आजही या विज्ञान युगात वाचायला, ऐकायला मिळते की महिलांना मंदिर प्रवेश नाकारला , महिलांना सैन्यात कायमस्वरूपी स्थान द्यावे काय ? महिलांना वेतांनाच्या बाबतीत दुजाभाव हा मुद्दा तर जागतिक स्तरावर गजतो आहे . महिलांचा हुंड्यासाठी छळ , कौटुंबिक छळ इत्यादि
          स्त्रियांना सर्वच स्तरांवर झगडावे लागते . अगदी कौटुंबिक , सामाजिक स्तरावर देखील. सुरुवात मुलीच्या जन्मापासून होते , मुलगी झालीतर नाके मुरडली जातात का तर ते दुसर्‍याचे धन . मग मुलगी जशी मोठी होत जाते तश्या तिच्यावरच्या जबाबदर्‍या वाढत जातात . तीने असेच वागावे , तसेच कपडे घालावेत , इकडे जाऊ नये , लवकर घरी यावे वगैरे वगैरे .लग्नाचे वय झाले तर पटकन लग्न उरकले तर ठीक नाहीतर मुलीच्या व्यक्तिमात्वावर शंका घेतली जाते . नंतर मुलबाळ झाले की नाही,अशी अनेक बंधने अंगावर घेऊन बिचारी सकाळ पासून संध्याकाळ पर्यन्त झगडत असते तरीही अश्या परिस्थितीत देखील अनेक महिला विविध स्तरांवर आपले नाव कामावताना दिसतात.
           फार दूरचेच कशाला घ्यायचे माजी आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई मी लहानपणी बघायचो सकाळी लवकर उठून झडलोट करायची , आंघोळ उरकून जात्यावर दळण दळायची नंतर सगळ्यांचा स्वयंपाक करायची , तो उरकून शेतात जाऊन तिकडची सर्व कामे उन्हातान्हात करायची , संध्याकाळी परत आल्यावर स्वयंपाक , मग भांडी  घासयची अशी तिची दिनचर्या असायची नंतर सुना आल्या मदतीला पण तिची धावपळ काही थांबली नाही शेवट्पर्यंत .तीच तर्‍हा माझ्या आईची कधी गावाकडे गेलो तर दुरून पाणी आणावे लागे डोक्यावर . डोक्यावर म्हणजे एकावर एक दोन हांडे आणि काखेत एक कळशी.अशा पाच सहा खेपा कराव्या लगायच्या, मग स्वयंपाक, एकत्र कुटुंब असल्यामुळे घरात खूप सारे कपडे असायचे धुवायला ती सर्व कपडे घेऊन नदीवर जावे लागायचे . आणि आज माझी पत्नी सकाळी लवकर उठून मुलांचे डबे बनवायचे, माझा डबा बनवायचा, मग कपडे धुणे , भांडी घासणे, मुलांना शाळेतून घेऊन येणे, त्यांचा अभ्यास घेणे , बाजाऱ हाट यात संपूर्ण दिवस जातो मग परत रात्रीचे जेवण परत भांडी घासणे इत्यादि ...हा पाढा काही संपत नाही . एवढेच नाही ऑफिस मध्ये देखील मी बघतो काही महिला सहकारी घरचे काम उरकून सकाळीच ऑफिसला येतात तिकडे त्यांना अफाट काम असते कधी कधी घरी जायला खूप उशीर होतो पण त्यांना कधीच तक्रार करताना बघितले नाही.त्यांनाच काय वरील कुठल्याही स्त्रीला तक्रार करताना मी बघितले नाही .
           अशा सर्व स्त्रियांना मला सलाम करावा वाटतो .पण खरच त्यांना आपण ज्ञाय देऊ शकतो का हा प्रश्न पडतो . कारण आपण नेहमीच त्यांची चेष्टा उडवत असतो त्यांच्या अकार्यक्षमतेविषयी . महिलांना गाड्या नीट चालवता येत नाहीत , प्रशासनात त्या काय दिवे लावणार ? हिशोबतील त्यांना काय कळते , त्यांना समानता कशाला हवी आहे त्या डोक्यावर बसतील वगैरे वगैरे जोपर्यन्त ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपण त्यांना पूर्ण ज्ञाय दिला असे होणार नाही . जेंव्हा आपण त्यांचा योग्य सन्मान करू तेंव्हा आपल्याला जागतिक महिला दिन साजरा करावा लागणार नाही .

Sunday, March 1, 2020

माझी आजी




             माझी आजी आत्ता येवढ्यात देह ठेऊन गेली . जशी सर्वांची आजी असते तशी ती माझी पण आवडती आजी होती. आम्ही सर्व नातवंडे तिला ताई आजी म्हणत असू आणि बाकी सर्व गावातील मंडळी तिला ताई म्हणत असत .ताई आजी म्हणजे माझ्या आईची चुलती पण तिने माझ्या आईला मायेची सावली दिली . आणि आम्हाला पण तेवढाच लळा लावला .
            मला अजूनही चंगाले आठवते आहे मी लहान असताना माझ्या वडिलांचा मोठा अपघात झाला होता आणि त्यांना पुण्यातील एका हॉस्पिटल मध्ये ठेवले होते . त्याचा पाय तुटला होता आणि त्यांना पुन्हा पायावर चालण्यासाठी एक  महीना तिकडेच राहावे लागणार होते. माझे वडील एक प्राथमिक शाळेतील शिक्षक होते. घरी मी माझी छोटी बहीण आणि आई एवढेच छोटे कुटुंब होतो .वडिलांना पुण्यात भार्ति केले होते. आम्ही राहायला तिथून जवळ जवळ ७५ किमी दूर नारायणगाव येथे राहत होतो आणि आईला पण पुण्यात जाणे भाग होते वडिलांच्या मदतीसाठी. आम्ही भावंड तर खूपच लहान होतो .त्यात आईला पुण्यातील काहीच माहिती नव्हते .अशा परिस्थितीत आजी मदतीला धावून आली.तिचे दूरचे नातेवाईक पुण्यात राहायचे .त्यांचे घर पण काही खूप मोठे नव्हते .एका रूम चे छोटेसे बैठे घर पण आम्ही भावंडे आई आजी त्यांचाकडे राहायला गेलो .त्यांच्या कडे पण बरेच लोक राहायला होते एवढ्याश्या घरात पण त्यांनी देखील खूप आदराने आमचे आतिथ्य केले . आजी ने आमचा सांभाळ केला व आई वडिलांचा डब्बा, औषधपाणी बघू लागली .केवढा आधार वाटला आईला त्यावेळी आज्जीचा. ती अशीच होती सर्वांच्या मदतीला धावून जाणारी . सर्वांवर भरभरून प्रेम करणारी .
            आम्ही नातवंडे त्यात मग आम्ही मामे भाऊ , मावस भाऊ , मामे बहिणी , मावस बहिणी ऊनहाळ्याच्या सुट्टीत आजोळी राहायला जायचो आणि खूप दंगा करायचो.आजी कधी एकटी असेल तरी तिने कधी तक्रार केली नाही .कधी आरडाओरडा केला नाही . आम्हाला छान पैकी भाकरी ताक आणि एखादी भाजी वर चटणी असा प्रेमाने भरलेला दुपारची न्याहारीचा बेत पाटीभरून डोक्यावर घेऊन शेतात यायची आणि आम्ही खेळून दमलेलो नातवंड त्यावर तुटून पडायचो .
                        पुढे आम्ही मोठे झालो आणि आजोळी जाणे कमी झाले .कधी मधी आम्ही तिला भेटायला जायचो तर तिची एकाच तक्रार असायची," का रे मला भेटायला येत नाही?. तुम्हाला साधा फोन पण करता येत नाही का ? " तिला खूप वाटायच की यांनी मला भेटायाला यावे माझी चौकशी करावी . म्हणून कधी कधी आम्ही मुद्दामहून वाकडी वाट करून तिला भेटायला जायचो .निघताना तिच्या जवळ जे काही सापडेल जसे की भाज्या , खरवस ,मिठाई , तिच्या परस बागेतील फळे जे जे तिला सापडेल ते ती आम्हाला पिशवीत भरून देत असे .तिच ते प्रेम बघून आम्ही कृतकृत्य होत असू .
            अस प्रेम तिने फक्त आम्हालाच दिल असे नाही .ती एका छोट्याशा गावी रहात असे त्याचे नाव पिंपळगाव . कमी लोकवस्ती असलेले पण सुंदर गाव त्यातील एकूण एक माणूस ताई ला ओळखत होता .त्याला कारण एकच, प्रत्येकाची विचारपूस ती जातीने करायची ,त्यांच्या सुख दू :खात ती धावून जायची . कोणाच्या घरी काही शुभकार्य असुदेत किंवा दू:खद घटणा घडुदेत ताई आजी तिकडे उपस्थित असायचीच .त्यामुळे तिच्या बद्दल आमच्याच काय पण संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांच्या मनात तिच्या बद्दल प्रेम आणि आपुलकी होती.
            आत्ता एवढ्यात ती आम्हा सर्वांना सोडून निघून गेली . ही वार्ता समजल्या वर प्रचंड जनसागर लोटला तिच्या अंतिम दर्शनाला .
हा एवढा लेखन प्रपंच एवढ्याच साठी केला कारण तिने जसे सर्वांना प्रेम आणि आपुलकी दिली तसेच प्रेम आणि  आपुलकी आम्हाला देखील देता येईल का सर्व जगाला ?आज आपण एवढे व्यस्त झालो आहोत की घरातल्या माणसांची देखील आपल्याला विचारपूस करायला वेळ नसतो किंवा आपण तो काढत नाही .आपण त्यांना गृहीत धरून चाललेलो असतो . ही जुनी जाणती देवा सारखी माणसे एक एक करून जगातून निघून गेल्यावर कोण आपल्यावर एवढे निर्व्याज प्रेम करेल ? कोण आपल्याला शिकवेल की आपुलकी कशी जपावी .नाती गोती कशी जपावीत .
                        आजी तुझी आठवण कायम येत राहील मला आणि आम्हा सर्वांना. जाताना तू मात्र खर्‍या प्रेमाला पोरक करून गेलीस ही खंत मात्र कायम राहील मनात 


Sunday, February 9, 2020

व्हॅलेंटाईन डे



                       प्रेमाचा दिवस जवळ येत चालला आहे (व्हॅलेंटाईन डे) तसे तसे बाजार अनेक वस्तूंनी सजत चलल्या आहेत. व्यापारी मंडळी या गोष्टींचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतात.महाविद्यालयांमध्ये विविध दिवस (days) साजरे होऊ लागले आहेत. तरुण मुलांमध्ये तर याची खुपच क्रेझ असते.आपल्याला आवडणारा मुलगा किंवा मुलगी यांना  प्रपोज करणे त्याला किंवा तिला आपल्या प्रेमाची कबुली देणे या दिवसा मुळे खुपच सोप्पे झाले आहे. 
                      मला आठवते आहे काही वर्षांपूर्वी हा दिवस साजरा करू नये म्हणून काही राजकीय पक्ष विरोध करत असत.त्यांचा विरोध एवढा टोकाचा होता की ते कोणी युगुल एकत्र दिसले की ते त्यांना मारायचे. आता मात्र परिस्थिती बरीच बदलली आहे, या दिवसाला समाज मान्यता मिळते आहे राजकीय पक्षांचा विरोध तर मवाळ झाला आहेच परंतु कोणीही काही हरकत घेताना दिसत नाही.
                      याचीच अजुन एक दुसरी बाजु पण आहे. हा दिवस खरेतर प्रेमाची कबुली देण्याचा आहे पण प्रामुख्याने याचा अर्थ फक्त एका पुरुषाचे एका स्त्रीवरील प्रेम असाच घेतला जातो. खरे तर प्रेम हे कोणतेही असू शकते जसे की मित्राचे , भाऊ बहिणीचे, आई वडिलांचे  आणि काही वेळा तर असे लक्षात येते की या दिवसाचा खूपच विचित्र अर्थ घेऊन तरुण मुले मुली शारीरिक भुक भागविण्याचा दिवस असा काढतात मग औषधाच्या दुकानांमध्ये गर्भनिरोधक वस्तू घेण्यासाठी रांगा लावताना पण दिसतात.
                      आयुष्यात काही लोकांना खुप प्रेम मिळते तर काही बिच्चारे प्रेमाला पारखे असतात आणि आयुष्यभर तडफडत असतात ते प्रेम मिळवण्यासाठी.तर दुसरीकडे काहींना खूप प्रेम मिळते पण त्यांना त्याची किंमत नसते. मला वाटते प्रत्येकाला प्रेमाची गरज असते आयुष्यात पण ते योग्य वेळी योग्य प्रमाणात मिळायला हवे.
नमस्कार भेटू पुन्हा नव्या लेखात..

Saturday, February 8, 2020

श्री गणेशा




               राम राम मंडळी हा माझा पहिलाच ब्लॉग आहे...खूप दिवस मनात होते की काहीतरी ऑनलाईन लिहावे,खूप विचार दरवळत असतात मनाच्या या कुपीत त्याचा सुगंध सर्वांपर्यंत दरावळाव ही ईच्छा होतीच.बघुयात आता कसे जमते ते. मी जे जे सुचेल जसे जसे सुचेल तसे लिहित जाणार आहे. लेख लिहिण्याचा छंद मला तसा लहानपणापासूनच आहे परंतु कामाच्या व्यापात काही लिहिण्याचा संबंधच राहत नाही.त्यातल्या त्यात मराठी वाचन आता फक्त सकाळी वर्तमानपत्र वाचे पर्यंतच राहिला आहे. माझा लेखन प्रपंच किती वाचक वाचतील आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील याबद्दल माझ्या मनात कुतूहल जरूर आहे,पण मी ठरवले आहे त्याचा फार विचार करायचा नाही आणि फार दडपण पण मनावर येऊ द्यायचे नाही.ईश्वर चरणी एकाच प्रार्थना आहे की मला छान छान विषय सुचूदेत आणि या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचवू दे.
                               या माध्यमातून जे  काही विचार मी मांडणार आहे ते संपूर्णपणे माझे विचार असतील कदाचित ते काही वाचकांना पटणारनाहीत, त्यात असंख्य व्याकरणाच्या किंवा लेखनाच्या चुका असतील पण वडिलकीच्या नात्याने त्यांनी मला समजून घेऊनमाफ करावे ही प्रार्थना.हा खटाटोप करताना एक लक्षात आले की हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही, सुरवात मराठी फॉन्ट शोधण्यापासून झाली, खूप शोधला पण सापडला नाही.मग नाईलाजाने मी हे सर्व आता मोबाईल फोनवर टाईप करतो आहे.पण या अडचणींची चिंता नाही वाटत कारण काही तरी नवीन करतो आहे याचीच जास्त मजा वाटते आहे.  
                             मी माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना आनंदाने एक गोष्ट सांगणार आहे , हीच कि मी आता ब्लॉग रायटर झालो आहे आणिपुढे माझे लेख वाचून कदाचित काही नवीन काही मित्र व नवीन माहिती देणारे गुरु भेटतील. काही लोक समीक्षा करून टीका करतीलही पण माझा प्रयत्न माझे लिखाण अधिकाधिक सुधारवण्याकडे असेल. चला एवढेच हितगुज मला तुमच्याशी करायचे होते .

एक नवा अध्याय सुरु होतो आहे तुमच्याही शुभेच्छा असूदेत. मनःपूर्वक धन्यवाद

लॉकडाउन

आजची सकाळ काही वेगळीच आहे , सर्वजण चिंतेत आहेत , जी भिती आजपर्यंत ऐकून होतो ती आता हळूहळू अगदी आपल्या घराशेजरी येऊन थबकली आहे. पंतप...